Thursday, February 11, 2010

श्री स्वामी समर्थ महाराज

"निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामीबळ नित्य पाठीशी आहे रे मनाअतर्क्य अवधूत हे स्मर्तुगामि अशक्य ही शक्य करतील स्वामी"
"स्वामी माझा भवतारी आला तारक कैवारी आनंद म्हणे रे निकट आधी शोधा रे अक्कलकोट"

ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज

..१३८० च्या सुमारास श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज ह्यांनी गाणगापुरमधे पादुका स्थापन केल्या. त्यानंतर शैल यात्रेचे साधून ते कर्दळी वनात अदृश्य झाले. ह्या कर्दळी वनात सुमारे 300 वर्ष महाराजांनी कठोर तपश्चर्या केली.ह्या काळात मुंग्यांनी त्यांच्यावर वारूळ निर्माण केले.एके दिवशी उध्दव नावाचा लाकूडतोडया त्याच कर्दळी वनात लाकडे तोडीत असताना त्याच्या हातून कुर्हाड निसटली. ती वारूळावर पडली. कुर्हाड वारूळावर पडताच त्यातून रक्ताची धार उडाली क्षणातच दिव्य प्रकाश पडून उध्दवासमोर अजानबाहू तेजस्वी मूर्ती प्रगट झाली तेच अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज... अबब !काय ते तेजस्वी रूप . त्यांच्या तेजाने सर्वत्र प्रभा फाकली होती. त्यांचे ते नेत्रदीपक रूप उद्धव पाहतच राहिला
आपल्या हातून ह्या महापुरू्षाला जखम झाली ह्या विचाराने उध्दवाला दुःख झाले भय वाटू लागले. तो भीतीने थरथर कापू लागला . आपल्या हातून फार मोठा अपराध घडल्याने आता महाराज आपल्याला भस्म करतील अशी भीती त्याला वाटू लागली . क्षमायाचनेने हात जोडून उभा राहिला . परंतु महाराजांची प्रेमळ नजर पाहताच त्याची भीती क्षणात गेली त्याच्याकडे स्मित करुन स्वामी म्हणाले, असा घाबरू नकोस तू तर फक्त एक निमित्तमात्र आहेस जगाच्या उद्धारासाठी आम्हाला अवतार घ्यायचाच होता. तुझे कल्याण होईल . त्यानंतर स्वामी पंढरपूर , मोहळ असे भ्रमण करीत सोलापुरास आले. त्यानंतर मंगळवेढे नामक गावास स्वामींनी काही काळ वास्तव्य केले तिथल्या भक्तांना विविध स्तरावर मार्गदर्शन केले. भेटेल त्याला आपल्या लीलेने आगळया वेगळया पध्दतींनी दुःखमुक्त करून कार्यरत केले.
इसवी सन 1856 मध्ये स्वामी महाराजांनी अक्कलकोट प्रवेश केला. तेथल्या बावीसवर्षांच्या वास्तव्यात सर्व विश्वाला दैदिप्यमान असे तीर्थक्षेत्र अक्कलकोट करून जगातील अनेक मान्यवरांना मार्गदर्शन केले. प्रत्यक्षात स्वामी महाराज आज 2009 मध्ये देखील भक्तांच्या पाठीशी सतत राहून त्यांना मार्गदर्शन करून कार्यरत करीत आहेत अनंतकाळ पर्यंत करीत राहतील.
श्री स्वामी समर्थ हे श्री दत्त महाराजांचा पूर्ण ब्रह्मस्वरूप अवतार आहेत . भक्तांनी त्यांना ज्या दृष्टीने पाहिले त्या स्वरूपात त्यांनी दर्शन दिले आहे. कोणाला श्री विठूमाऊलीच्या रूपात त्यांचे दर्शन घडले. तर कुणाला श्री भगवान विष्णूच्या स्वरूपात तर कुणाला भगवती देवीच्या रूपात. महाराजांनी भक्तांच्या कल्याणासाठी अनेक लीला दाखविल्या.
अनन्यभावाने भक्ती करणाऱ्या भक्तांच्या सदैव पाठीशी राहून त्यांचा योगक्षेम चालविण्यासोबतच ''भिऊ नकोस..मी तुझ्या पाठीशी आहे.'' असे अभिवचन त्यांनी दिले . आणि आजही ते आपल्या भक्तांसाठी
संकटाच्या वेळी धावून येतात . आणि त्यांच्या पाठीशी उभे रहातात . त्यांच्या चमत्करांचे आजही लोक अनुभव घेतात .
त्यांच्या भक्तिमधे असेच मन एकाग्र व्हावे आणि रममाण व्हावे हीच स्वामिंच्या चरणी प्रार्थना .
 
'श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ'

''अनंतकोटी ब्रह्मांडनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तप्रतिपालक अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय.''
'' अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त जय जय स्वामी समर्थ
''भिऊ नकोस..मी तुझ्या पाठीशी आहे.''